कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार झाली आहे. निवडणूक रिंगणातील तिन्ही पॅनेलच्या समर्थकांनी सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे. समर्थकांकडून आपल्याच पॅनेलचा विजय होणार. असा दावा सुरू केला आहे. राजकीय शक्तीप्रदर्शन, प्रचारसभा, पदयात्रांना जोर आला आहे. तिन्ही पॅनेलच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका लावला आहे.
सत्तारुढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांचा समावेश आहे. प्रमुख विरोधक धैर्यशील पाटील कौलवकर यांची संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकर आघाडी आणि भाजपचे हंबीरराव पाटील, नामदेव काका पाटील, काँग्रेसचे सदाशिवराव चरापले, शिवसेनेचे अजित पाटील, शेकापचे बाबासो देवकर यांची शिवशाहू विकास परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. प्रचारामध्ये साखर कारखान्याच्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कारभाराचा उहापोह केला जात आहे. दिवाळी संपल्याने थंडावलेला प्रचार वेगवान झाला आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तिन्ही पॅनेलचे समर्थक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.