गव्हाची जोमदार खरेदी, गेल्या वर्षीचा एकूण खरेदीचा आकडा केला पार

रब्बी विपणन हंगाम 2024-25 दरम्यान गव्हाची खरेदी देशभरातील प्रमुख खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू आहे. या वर्षात आतापर्यंत 262.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला असून, केंद्रीय साठ्यात गेल्या वर्षी झालेल्या एकूण 262.02 लाख मेट्रिक टन खरेदीला मागे टाकत यावर्षी गव्हाची खरेदी झाली आहे.

रब्बी विपणन हंगाम 2024-25 मध्ये एकूण 22.31 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 59,715 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) रुपात प्रदान करण्यात आले आहेत. या गहू खरेदीमध्ये प्रमुख योगदान पाच राज्यांचे आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अनुक्रमे 124.26 लाख मेट्रिक टन, 71.49 लाख मेट्रिक टन, 47.78 लाख मेट्रिक टन, 9.66 लाख मेट्रिक टन आणि 9.07 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे.

धान खरेदीही सुरळीत सुरू आहे. खरिप विपणन हंगाम (KMS) 2023-24 दरम्यान 489.15 लाख मेट्रिक टन तांदुळाच्या समतुल्य 728.42 लाख मेट्रिक टन धान आतापर्यंत 98.26 लाख शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात आले आहे आणि 1,60,472 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) रुपात प्रदान करण्यात आले.

उपरोक्त निर्देशित खरेदी केल्यामुळे, केंद्रीय साठ्यामध्ये सध्या गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 600 लाख मेट्रिक टनाच्या पुढे गेला आहे. यामुळे देशाला प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत नागरिकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बाजारातील धान्य उपलब्धतेसाठी देखील सुखावह स्थिती निर्माण झाली आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here