पुणे : गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ३,६३६ रुपये प्रती टन असा उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. कारखाना प्रशासनाने यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतीटन ३,००० रुपये आणि कांडे बिलापोटी २०० रुपये असे एकूण ३,२०० रुपये दिले आहेत. उर्वरीत बिलापैकी दिवाळीला प्रती टन २५० रुपये आणि मकर संक्रांतीला प्रती टन १८६ रुपये दिले जाणार आहेत. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष केशवराव जगताप व उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी सांगितले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे माळेगाव कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी असा ३ हजार ६३६ रुपये प्रतिटन ऊसदर दिला आहे. गेटकेन ऊसधारकांना यापूर्वी ३ हजार रुपये प्रतिटन दिले आहेत, तर अजून त्यांना १०० रुपये टन दिवाळीला व १०० रुपये टन मकर संक्रांतीला देण्याचे ठरले आहे. खोडवा ऊस उत्पादकांना १५० रुपये प्रती टन अनुदान असे एकूण ३,७८६ रुपये मिळणार आहेत. व्हरायटी ऊस उत्पादकांना १०० रुपये अनुदानासह एकूण ३,७३६ रुपये मिळतील. कारखान्याने हंगामात १३,२७,००० मे. टन उसाचे गाळप केले. १२.२३ सरासरी साखर उताऱ्याने १५ लाख २० हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.