अहिल्यानगर : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ९ साखर कारखान्यांसह अन्य दोन नामवंत कंपन्यांची सुमारे ८० लाखांची बँक हमी जप्त करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने दिले आहेत. प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दोन क्षेत्र अधिकाऱ्यांनी काही साखर कारखाने आणि उद्योगांची पाहणी यापूर्वी करण्यात आली होती. यात प्रदूषण नियंत्रण युनिटच्या निरीक्षणात काही असमतोल ठेवणाऱ्या बाबी निदर्शनास आल्या होत्या.
‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्वर कारखाना, प्रताप ढाकणे यांचा केदारेश्वर कारखाना, आशुतोष काळे यांचा कोळपेवाडी कारखाना, राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी नागवडे कारखाना, विवेक कोल्हे यांचा कोपरगाव कारखाना, भानुदास मुरकुटे यांचा अशोक कारखाना, राहुल जगताप यांचा कुकडी कारखाना आणि विखे यांचा प्रवरानगर कारखाना तसेच जयश्रीराम या कारखान्यांची बँक हमी जप्त करण्याचे आदेश एप्रिल २०२४ मध्ये देण्यात आले आहेत. याशिवाय, एमआयडीसीतील सिद्धी फौज, कायेनेटीक इंजिनीअरिंग या दोन कंपन्यांचाही कारवाईत समावेश असल्याचे पुढे आले आहे. कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक परवान्यांसह निर्धारित ‘बँक हमी’ प्रदूषण मंडळाकडे ठेवावी लागते. नियमावलीचे काटेकोर पालन न झाल्यास ही बँक हमी जप्त केली जाऊ शकते.