सांगली : आळसंद-विटा (ता. खानापूर) येथील विराज केन्स कारखान्याने गेल्या गळीत हंगामात १,१०,००० मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले होते. त्यावेळी प्रती टन २,८०० रूपये पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता. आता दिवाळीसाठी शेतकऱ्यांना प्रती टन २०० रुपये दिले जात आहेत. यानुसार होणारी २ कोटी २० लाख रुपयांची दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर मंगळवारी वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली. याचबरोबर विराज केन्स कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक २ महिन्याचा पगार म्हणजेच ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. पाटील म्हणाले की, कारखान्याने गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रूपये प्रमाणे दर दिला आहे. अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे ऊसाचे वजन केले जात असल्याने वजनामध्ये अचूकता व पारदर्शकता आहे. यावर्षीच्या ऊसाच्या गळीत हंगामामध्ये विराज केन्स कारखान्याचे दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून गुणवत्तापूर्ण गूळ पावडर तयार होत असल्याने बाजारपेठेमध्ये विराजच्या गूळ पावडरला चांगली मागणी असल्याचेही सदाशिवराव पाटील यांनी सांगितले. यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस विराज केन्स कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.