सांगली : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १२ किलो वाढीव साखर, संचालक मंडळाची संख्या २१ वरून २४ करण्याबाबत पोटनियम दुरुस्ती मान्यता यांसह सौर ऊर्जा व बायोगॅस प्रकल्पाच्या ठरावाला मंजुरीचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व ठराव सभासदांनी मंजूर केले. माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, विश्वास कारखान्यामार्फत नजिकच्या काळात चिखली व रिळे येथे सोलर प्रकल्प उभा करून तेथे उत्पादित वीज विद्युत वितरण कंपनीस विक्री केल्याने त्याचा फायदा कारखान्यास होणार आहे. दरम्यान, आमच्या विश्वास उद्योग समूहावर टीका करणारे विरोधक सत्यजित देशमुख यांनी साठ कोटी रुपयांचा निनाईदेवी कारखाना २७ कोटीला घाट्यामध्ये विकून प्रतिवर्षाला २५ लाख रुपये त्यांच्याकडून घेण्याचा सौदा केला आहे अशी टीका नाईक यांनी केली. सभेत कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात येत असलेल्या बायोगॅस (CBG) प्रकल्पालादेखील मंजुरी देण्यात आली. सभासदांना वाढदिवस कर देण्याचा मुद्दा माजी संचालक रणजित नाईक यांनी मांडला. अध्यक्ष नाईक यांनी त्या मुद्याला मंजुरी देत सभासदांना आता ६५ ऐवजी ७७ किलो म्हणजे बारा किलो वाढ साखर देण्याचा निर्णय जाहीर केला. संचालक विराज नाईक यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी नोटीस वाचन केले. यावेळी संचालक विश्वास कदम, यशवंत निकम, यशवंत दळवी, सुहास पाटील, संदीप तडाखे, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंग नाईक, सम्राटसिंग नाईक, रणजित नाईक, सुकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, सुरेश चव्हाण, बाबासाहेब पाटील, सुनीता नाईक, डॉ. शिमोन नाईक, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.