सांगली : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व संचालक हंबीरराव पाटील यांच्या हस्ते आसवनी प्रकल्पासाठी आवश्यक ४० टन क्षमतेच्या बॉयलर उभारणीचा भूमिपूजन समारंभ उत्साहात झाला. उसाच्या रसापासून दैनंदिन १.१० लाख लिटर प्रतिदिनी इथेनॉल निर्मिती होणाऱ्या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक बॉयलर उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पातून हंगाम सुरू असताना उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती होईल तर गाळप हंगाम बंद असताना मळीपासून इथेनॉल निर्मिती होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. भूमिपूजन प्रसंगी संचालक दिनकरराव पाटील, आनंदा पाटील व दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले.
अध्यक्ष नाईक म्हणाले की, कारखान्यात आतापर्यंत सहवीज निर्मिती, आसवनी, कार्बनडाय ऑक्साईड, कंपोस्ट खत, द्रवरूप खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची यशस्वी उभारणी झाली. त्यातून मिळणारा फायदा ऊस दरातून शेतकरी, सभासदांना दिला जात आहे. इथेनॉल उत्पादनातून मिळणारा फायदा ऊस उत्पादक पुरवठादार शेतकरी व सभासदांच्या उसाला दराच्या स्वरूपात होईल. यावेळी संचालक विराज नाईक, सुरेश चव्हाण, विष्णू पाटील, बाबासो पाटील, आमरे, सुहास घोडे-पाटील, शिवाजी पाटील, यशवंत निकम, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, बाळासो पाटील, सुकुमार पाटील, विश्वास पाटील व कोंडिबा चौगुले, कार्यकारी संचालक अमोल पाटील आदी उपस्थित होते.