पुणे : जागतिक पातळीवर एनर्जी आणि अन्नाची उपलब्धता या दोन प्रमुख समस्या होत्या. परंतु, संशोधनाच्या आधारावर निघालेल्या विविध पर्यायांमुळे या दोन्ही समस्यांचे निराकरण होऊ शकते. जगाची एनर्जीची गरज भागवण्याची क्षमता एकट्या साखर कारखान्यात आहे. अन्नापासून इंधन तयार करताना गरिबांचे अन्न हे श्रीमंताचे इंधन होऊ नये, या पातळीवरदेखील आपणास समतोल साधावा लागणार आहे. साखर उद्योग हा कल्पवृक्षासारखा असून दिवसागणिक त्याचे भवितव्य उज्ज्वल होत आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात ‘विस्मा’तर्फे आयोजित साखर कारखान्यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.
साखर उद्योग क्षेत्रातील राज्यातील १३३ खासगी साखर कारखान्यांची अग्रगण्य शिखर संस्था असलेल्या विस्मातर्फे प्रथमच साखर हंगाम २०२३-२४ मध्ये सभासद कारखान्यांना विविध पाच वर्गवारींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सचिव डॉ. पांडुरंग राऊत, भारत सरकारच्या नवीन व अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगीता कस्तुरे, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, साखर आयुक्त उपपदार्थांचे संचालक राजेश सुरवसे, खासदार अध्यक्ष बजरंग सोनवणे, सहकार आयुक्त दीपक तावरे, प्राज इंडस्ट्रीचे घनश्याम देशपांडे, ‘विस्मा’चे अजित चोगुले आदी उपस्थित होते. यावेळी द्वारकाधीश साखर कारखाना लि., जिल्हा नाशिक (उत्कृष्ट ऊस शेती विकास), दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रीज लि., जिल्हा कोल्हापूर (उत्कृष्ट साखर उत्पादन), श्री गुरुदत्त शुगर्स लि., जिल्हा कोल्हापूर (उत्कृष्ट उपपदार्थ उत्पादन), नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि., जिल्हा धाराशिव (संशोधन विकास आणि नावीन्यपूर्ण उपक्रम) आणि व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि., जिल्हा पुणे (उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन) या कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.