विठ्ठल कॉर्पोरेशन दिवाळीला २०० तर डिसेंबरमध्ये १०० रुपये देणार : आमदार संजयमामा शिंदे

सोलापूर : विठ्ठल कॉर्पोरेशन कारखान्याच्यावतीने गेल्यावर्षीच्या ऊसास २३०० रुपये प्रती मेट्रिक टन दर उत्पादकांना अदा केले आहे. उर्वरीत २०० रुपये दिवाळीला तर डिसेंबरमध्ये १०० रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ च्या १६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ मंगळवारी आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

बॉयलर अग्नी प्रदीपन प्रसंगी प्रविण पाटील व त्यांच्या पत्नी अर्चनाताई यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली. संस्थापक चेअरमन आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, गतवर्षी ५ लाख ५९ हजार मे. टन ऊस गाळप केला आहे. यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरीता बोनस ८.३३ टक्के देण्यात येणार आहे. गतवर्षी गाळप केलेल्या ऊसापैकी ६५ टक्के इथेनॉल व ३५ टक्के साखर उत्पादित करणारा महाराष्ट्रातील कदाचीत पहिला कारखाना असल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावर्षी सभासदांना प्रती शेअर्स ३० किलो साखर मोफत वाटप केली आहे.

आमदार बबनराव शिंदे यांनी यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरीही शेतकऱ्यांकरीता पाण्याची दोन आवर्तने दिली जातील असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, विठ्ठल कॉर्पोरेशनने प्रथम गाळप हंगाम २००८ ते आज तागायत एफआरपी दरापेक्षा २३५ कोटी रुपये जादा दिले आहेत. मागील २०२२ – २३ मधील गाळप झालेल्या ऊसास एफआरपीपेक्षा प्रती मे. टन २०० रुपये जादा दर दिला आहे. असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद यांनी आभार मानले. केनयार्ड सुपरवायझर अजिनाथ गोडगे यांनी सूत्रसंचालन केले. माजी आ. विनायकराव पाटील, वामनभाऊ उबाळे, उद्धव माळी, सुरेश बागल, सुहास पाटील, बंडु ढवळे, विजयकुमार पाटील, हनुमंत पाडुळे, आप्पासाहेब उबाळे, आण्णासाहेब ढाणे, धनंजय मोरे, संतोष अनभूले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here