सोलापूर : म्हैसगाव (ता. माढा) येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड या साखर कारखान्याचे विस्तारीकरण अल्प कालावधीमध्ये पूर्ण झाले. कारखान्याचा १६ वा गाळप हंगाम २०२३-२४ सुरळीत आहे. चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसासाठी पहिला ॲव्हान्स हप्ता प्रती मे. टन २,७०० रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक-चेअरमन, आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
आ. संजयमामा शिंदे यांनी प्रती टन २,७०० रुपयांप्रमाणे सभासद व बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणार असल्याचे सांगितले. कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणाही पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिल्डा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, कल्याण पाटील, प्रदीपकुमार पाटील, परमेश्वर माळी, सचिन शिंदे आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.