सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालविण्याची सभासद, शेतकऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. कारखान्यात यंदाच्या हंगामात २० लाख मे. टन ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे यासाठी जे काही करावे लागेल, ते आपण करू, असे प्रतिपादन चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. चेअरमन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिर झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कारखाना परिसरात १० हजार रोपांची लागवड करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन पाटील यांचा कारखाना तसेच श्री विठ्ठल प्रशालेच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन पाटील, राजाराम सावंत, दीपक पवार, दिग्वीजय पाटील, धनाजी खरात, नवनाथ नाईकनवरे, तानाजी बागल, प्रा. तुकाराम मस्के आदी उपस्थित होते. प्राचार्य विठ्ठलराव नागटिळक व राजेंद्र डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. ओ. जे. अवधूत यांनी आभार मानले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.