सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊसाला प्रती टन उच्चांकी ३,५०० रुपये प्रती टन देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची यंदाही परंपरा पाटील यांनी कायम ठेवली. रविवारी (ता. ८) विठ्ठल साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात अभिजीत पाटील यांनी आगामी हंगामात प्रती टन साडेतीन हजार रुपयांचा ऊस दर जाहीर केला. पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी उच्चांकी ऊस दर जाहीर करून अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिजीत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू केला. सध्या तो सुस्थितीमध्ये आला आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये पाटील यांनी सर्वाधिक तीन हजार रुपयांचा ऊस दर दिला आहे. पाटील यांनी एक रक्कमी ऊस दर देण्याची परंपरा सुरू केल्याने जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदारांना देखील अधिकचा ऊस दर द्यावा लागत आहे. ऊस दराची स्पर्धा सुरू झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ऊस दराचा मुद्दा देखील चर्चेत राहणार आहे. याबाबत पाटील म्हणाले की, गतवर्षी हंगाम यशस्वीपणे पार पाडला. सभासदांना तीन हजार रूपये ऊस दर दिला. यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. दररोज किमान १०,००० टन गाळप होईल. आता ३५०० रुपये दर दिला जाईल.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.