सोलापूर : जिल्ह्यातील कारखानदार ऊस दरावर बोलत असले तरी ते आपल्या कारखान्यांतील वजन काट्याबाबत बोलत नाहीत. जिल्ह्यात फक्त आमचा, विठ्ठल कारखान्याचा वजनकाटा बरोबर आहे, असा दावा विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केला. इतर कारखान्यांच्या वजनकाट्यांबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. या कारखान्यांच्या वजन काट्याचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे आहे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडल्याबद्दल उपरी (ता. पंढरपूर) ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
चेअरमन पाटील म्हणाले की, यंदा विठ्ठल कारखान्यामुळे जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या सभासदांना जादा ऊस दर मिळाला आहे. सध्या विठ्ठल कारखाना ८,००० टनाने गाळप करीत असून यार्डमध्ये ७ हजार टन गाळप होईल, एवढी वाहने शिल्लक आहेत. यावेळी माजी नायब तहसीलदार महादेव नागणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माजी संचालक सुर्यकांत बागल, संचालक पै. साहेबराव नागणे, सुरेश नागणे, दत्तात्रय नागणे, सुनील नागणे, नवनाथ गव्हाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कल्याणराव काळे गटाचे उपसरपंच सुरेश नागणे यांच्यासह वैभव नागणे, हरी आसबे यांनी पाटील गटात प्रवेश केला.