सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये आलेल्या उसाला ज्यादा अनुदान म्हणून देण्यात येणारी रक्कम ऊस पुरवठादारांना खताच्या स्वरूपात वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या अधिकारी व कामगारांनी यशस्वी गाळप हंगाम पार पाडल्याबद्दल एक महिन्याचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
रविवारी गंगामाई नगर, पिंपळनेर येथे कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ झाला. यावेळी ऊस जळीताबद्दल गाळपास आलेल्या ऊस बिलातून धोरणानुसार कपात केलेली रक्कम परत करण्यात येणार आहे. कारखान्याने दहा दिवसांत ऊस बिल देण्याची परंपरा कायम राखली असे अध्यक्ष आमदार शिंदे यांनी सांगितले. गळीत सांगता कार्यक्रमात संचालक लक्ष्मण खूपसे व पांडुरंग घाडगे यांच्या हस्ते १९ लाख १५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी प्रास्ताविक केले. संचालक सुरेश बागल यांनी आभार मानले. व्हा. चेअरमन वामनराव उबाळे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, संचालक वेतळा जाधव, रमेश येवले-पाटील, सचिन देशमुख, पोपट गायकवाड, शिवाजी डोके, लाला मोरे, शहाजी शिंदे आदी उपस्थित होते.