सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी मजुरांना गळीत हंगाम २०२३-२४ पासून तोडणी दरवाढ लागू करून फरकाची ३६ कोटी ४ लाख रुपये रक्कम त्यांच्या बँकेत जमा केली आहे. राज्य साखर संघाच्या स्तरावर झालेल्या ऊस तोडणी व वाहतुकीच्या सामंजस्य करारानुसार मजुरांना तोडणी दरात ३४ टक्के वाढ केली आहे. ३४ टक्के वाढीचा फरक देणारा विठ्ठलराव शिंदे हा राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे अशी माहिती, कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
आ. शिंदे म्हणाले की, या वाढीमुळे अंदाजे ३६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा कारखान्यावर पडला आहे. कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटच्या ऊस तोडणी मजुरांना ही दरवाढ लागू करून त्यानुसार बिले तयार करण्या आली आहेत. पुढील गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक करार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी ॲडव्हान्स वाटप सुरू आहे, असे आम. शिंदे यांनी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.