सोलापूर : २०२२-२०२३ हंगामात गाळपास आलेल्या उसाला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे १५० रुपयाचे अंतिम बिल १ सप्टेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. शिंदे म्हणाले, आजपर्यंत कारखान्याच्या पिंपळनेर युनिट एक व करकंब यूनिट दोन मध्ये मागील हंगामात गाळप झालेल्या २३ लाख ९१ हजार मेट्रिक टन उसाला २५५० रुपये प्रति टन दर दिलेला आहे व आता १ सप्टेंबर रोजी १५० रुपये अंतिम बिल देण्यात येत आहे.
कारखान्याची एफआरपी रक्कम प्रति टन २,६५० रुपये आहे. मागील हंगामात हंगाम अखेरच्या महिन्यात १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत गाळपास आलेल्या उसाला ७५ रुपये प्रति टन जादा तर एक मार्चपासून हंगाम संपेपर्यंत आलेल्या उसाला प्रति टन १५० रुपये ज्यादा दर दिल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे, माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे, शिवाजीराव पाटील तसेच प्रमोद कुटे, दत्ता सुर्वे, संतोष पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.