पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ९ मार्च) मतदान पार पडत आहे. उरुळी कांचन येथे रविवारी मतमोजणी होणार आहे. तब्बल १३ वर्षे बंद असलेला कारखाना सुरू होण्याची आशा निर्माण झाल्याने मतदानावरून सभासदांत मोठी उत्सुकता आहे. मुंबई उच्च न्यायालयात अथक लढ्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर या कारखान्याची निवडणूक होत आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांचे दोन गट समोरासमोर आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शीतल पाटील, सहायक निवडणूक अधिकारी श्रीकांत श्रीकांदे व हर्षित तावरे हे काम सांभाळत आहेत. १३ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. शनिवारी ४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण २१,०१९ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यासाठी राज्य सहकार प्राधिकरणाने २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, सभापती दिलीप काळभोर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, माजी जि. प. सदस्य महादेव कांचन, पैलवान राहुल काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल रिंगणात आहे. तर विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल निवडणूक लढवत आहे.