पुणे: राज्यात साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढ कराराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. नवीन समिती गठित करण्याच्या मागणीसाठी ७ ऑगस्ट रोजी साखर आयुक्तालयावर ‘इशारा मोर्चा’ काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने घेतला आहे.साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी (दि. २९) साखर आयुक्त डॉ. कृणाल खेमनार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाने वेतनवाढीसाठी तत्काळ त्रिपक्षीय समिती गठित करण्याची मागणी केली.
साखर व जोडधंद्यातील कामगारांना पगारवाढ दयावी,कामगारांना वेतन व सेवाशर्ती ठरविण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित करावी,रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरती काम करणार्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळावे,साखर कामगारांचे थकीत वेतन मंडळाच्या पगार वाढीच्या करारानुसार वेतन मिळाले पाहिजे आदी मागण्या यावेळी करण्यात आली. साखर आयुक्तांना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.