बस्ती : वॉल्टरगंज साखर कारखान्याच्यावतीने थकीत रक्कमेपैकी एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आला. जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन यांनी सोमवारी तहसीलदारांकडे धनादेश सोपवला. शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांना पैसे देण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बजाज ग्रुपच्या फेनिल शुगर मिलच्या नावाने संचलित करण्यात येत असलेला वॉल्टरगंज साखर कारखाना २०१७-१८ मध्ये गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर बंद करण्यात आला. कारखाना अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. कारखान्याकडे शेतकरी आणि कामगारांची बिले थकीत आहेत. कारखाना सुरू करावा, थकबाकी मिळावी या मागणीसाठी वारंवार आंदोलने केली जातात. थकबाकी असल्याने कारखान्याविरोधात ५६ कोटी रुपयांची आरसी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारखान्यावर थकबाकी देण्याबाबत दबाव वाढवला आहे.
यानंतर मार्च महिन्यात कारखाना प्रशासनाने ३ कोटी ६ लाख रुपयांची बिले दिली होती. जिल्हा प्रशासनाने यातून एक कोटी ९७ लाख रुपये कारखान्याच्या कामगारांना आणि एक कोटी ९ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले. आता दोन महिन्यानंतर दुसऱ्या हप्त्यात एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. लवकरच या पैशांचे वितरण होईल, असे सांगण्यात आले.