वारणा साखर कारखान्याची भरारी, एका दिवसात उच्चांकी १४ हजार मे. टन ऊस गाळप

कोल्हापूर : जिल्ह्याच्या वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात एका दिवसात १४ हजार १३६ मे.टन उसाचे विक्रमी गाळप करून आजपर्यंतच्या इतिहासात नवा उच्चांक नोंदवला आहे. त्याचबरोबर कारखान्याने एका दिवसात १६,१५० साखर पोत्यांचे उच्चांकी उत्पादन केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी दिली. यावेळी मार्चमध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन २०० जादा दर देण्याचे जाहीर केले आहेत, असे सांगत आमदार कोरे यांनी खातेप्रमुखांचा सत्कार केला.
वारणा कारखान्याने ५६ दिवसांत ६ लाख ५ हजार ८५१ मेट्रिक टनाचे गाळप करून ११.३८ साखर उताऱ्याने ६ लाख ५५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक शहाजी भगत, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ मार्गदर्शक, तांत्रिक सल्लागार आर. एस. कुलकर्णी, चीफ इंजिनिअर अनंत पाटील, श्रीकांत पाटील, आनंद कुंभार, प्रमोद पाटील, गोकुळ धोमसे, संदीप खोत आदींच्या सहकार्याने हे यश मिळत आहे असे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व संचालक मंडळ, सचिव बी. बी. दोशिंगे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here