मुंबई : बंगालच्या खाडीत या आठवड्यात मोठ्या बदलाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मतानुसार उत्तर भागात कमी दबावाचा पट्टा तयार होऊ शकतो. परिणामी पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, झारखंडवर याचा थेट परिणाम होईल. मध्य प्रदेशात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून त्याचा परिणाम मराठवाडा, तेलंगणा, तमीळनाडूत होऊ शकतो.
हवामान विभागाने या आठवड्यात मुंबई तसेच राज्याच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईच्या विभागीय हवामान केंद्राच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत हवामानात बदल होईल. कोकम, मध्य महाराष्ट्रातील घाट माध्यावर १० जूनपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासनाला तयारी करण्यास सांगितले आहे. किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत संबंधित मंत्र्यांना बैठका घेण्यास सांगितले आहे. मुंबई महापालिका क्षेत्र आणि कोकण विभागात ९ ते १२ जून या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती निवारणासाठी सरकार सज्ज झाले आहे.
मंगळवारी सकाळी मुंबईच्या काही भागात पाऊस झाला. सायन परिसरात पावसानंतर रस्त्यावर पाणी साठले. काल रात्री मुंबईत बहरामबाग येथे चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी आहेत.