कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ ४ डिसेंबर रोजी करण्यात आला. अद्याप कारखाना सुरू न झाल्याने शुभारंभाच्या दिवशी गव्हाणीत टाकलेली मोळी वाळली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी २० तारखेला कारखाना सुरू होईल, असे सांगितले. या दिवशी कारखाना सुरू न झाल्यास गव्हाणीतील ऊसाची मोळी प्रांत कार्यालयाच्या दारात आणून टाकू, असा इशारा अमर चव्हाण यांनी दिला आहे.
अमर चव्हाण म्हणाले की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गळीत प्रारंभ करण्यात आला. आता पंधरा दिवस उलटूनही कारखाना सुरू नाही. गव्हाणीत टाकलेला ऊस परत आणण्यासाठी कारखान्यावर गेलो. उपाध्यक्षांनी २० तारखेला कारखाना सुरू होईल, असे सांगितले. जर कारखाना सुरु झाला नाही तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील. कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही. जिल्हा बँकेने कारखान्याला ५५ कोटी रुपये कर्ज दिले. तरी कारखाना सुरू होत नसल्याची टीका त्यांनी केली. बाबुराव माने, शिवाजी माने, विजय पाटील, सतिश पाटील उपस्थित होते.