लाहोर : पाकिस्तानमध्ये जल संकट अधिक तीव्र बनले आहे. काबुल नदीला सर्वाधिक फटका बसला असून त्यातून होणारा पाणी पुरवठा गेल्या दहा वर्षातील सरासरी ४१,२०० क्युसेकच्या तुलनेत केवळ १६,७०० क्युसेकवर आला आहे. झेलम आणि चिनाब या नद्याची स्थितीही काबुलसारखी झाली आहे. पाणी पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. पंजाब सिंचन विभागाच्या एका अधिकऱ्याने सांगितले की, पाण्याच्या कमतरतेमुळे पंजाबला पुढील पाच ते सात दिवसांत आणि सिंधला पुढील १० ते १२ दिवसांत फटका बसेल. त्यातून कापूस, ऊसासारख्या पिकांचे अधिक नुकसान होणार आहे.
सद्यस्थितीत अनेक विभागांमध्ये ऊस, गहू, कापूस या पिकांसाठी पाणी नाही. डॉन या वृत्तपत्रातील माहितीनुसार, पाण्याच्या संकटामुळे फेब्रुवारी ते एप्रिल यांदरम्यान पिकांचे नुकसान होणे निश्चित आहे. आर्थिक स्थिती आणि भूकमारीच्या संकटापासून बचावासाठी पाकिस्तानला नव्या धरणांची निर्मिती करावी लागेल. हा एकच उपाय सध्या शिल्लक आहे.