नवी दिल्ली : देशातील १५० जलाशयांमध्ये एकूण पाणीसाठा ५०.४३२ BCM आहे. हा साठा त्यांच्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ २८ टक्के आहे, असे केंद्रीय जल आयोगाने (CWC) २ मे २०२४ रोजीच्या आपल्या ताज्या जलसाठा अहवालात म्हटले आहे. या जलाशयांमध्ये गेल्यावर्षी समान कालावधीत ६२.२१२ बीसीएम पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सध्याची पाणी उपलब्धता कमी आहे.
जलाशयांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेबाबत पूर्वेकडील प्रदेशांत चांगली स्थिती आहे. तेथे एकूण उपलब्ध पाणी ७.४५१ BCM आहे. हा पाणीसाठा जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३६ टक्के आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत येथील जलसाठा ३३ टक्के होता. देशाच्या उत्तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी पाणी उपलब्धता नोंदवली जात आहे. उत्तर भागात, एकूण उपलब्ध पाणी ६.०५१ BCM आहे, जे या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३१ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण पाणीसाठा ३७ टक्के होता.
देशाच्या पश्चिम विभागामध्ये, CWCच्या देखरेखीखालील ४९ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी ११.०८१ BCM आहे, जे या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या २९.८ टक्के आहे. गेल्या वर्षी समान कालावधीतील पाणीसाठा ३६ टक्के होता. मध्य प्रदेशात विविध २६ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी १७.४९६ BCM आहे. एकूण साठवण क्षमतेच्या हे पाणी ३६ टक्के आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४२ टक्के पाणी होते. दक्षिण भागात, उपलब्ध पाणी ८.३५३ BCM आहे. एकूण साठवण क्षमतेच्या हे प्रमाण १६ टक्के आहे. गेल्या वर्षी येथे २८ टक्के पाणी होते.
गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत आसाम, झारखंड, ओडिशा, नागालँड, गुजरात आणि केरळमध्ये चांगला पाणीसाठा आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे.