लातूर : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा मेघराजा कमी बरसला. त्यामुळे नद्या, धरणे अत्यंत कमी भरली आहेत. आगामी काही महिने पाण्याचा आणखी तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तरीही शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडील ओढा कमी झालेला नाही. शिरुर अनंतपाथ तालुका सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याने या भागातील शेतकरी नेहमीच ऊस पिकाला प्राधान्य देतात. यंदा पाऊस कमी झाल्याने आवर्षणाची परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जात आहे. पाण्याची संभाव्य टंचाई ओळखून ठिंबक सिंचन तंत्राचा वापर करुन त्याला पाणी देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील धामणगाव, तळेगाव (देवणी), लक्कड जवळगा, दगडवाडी, नागेवाडी, डोंगरगाव, घुग्गी सांगवी, शेंद, तिपराळ, साकोळ व शिरूर अनंतपाळ परिसरातील शेतकऱ्यांनी जेमतेम पावसावर यावर्षी ऊस लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागात मांजरा नदीवरील धनेगाव बॅरेजचे बारामाही पाणी घरणी नदीपात्रात असते. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांनी बारामाही पिके घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी पातळी खालावल्याचे दिसून येत आहे. तरीही शेतकरी नगदी पीक म्हणून उसाला प्राधान्य देत आहेत. काही साखर कारखाने कमी पाण्यावर ऊस शेती कशी करायची ? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतो आहे.