पाणी टंचाई : सांगली जिल्ह्यात पुढील हंगामात ऊस उत्पादन घटणार !

सांगली : जिल्ह्यात अपुरा पाऊस आणि पाण्याची टंचाई यामुळे उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. उसाचे क्षेत्र घातल्यास पुढील हंगामात साखर कारखान्यांची उसासाठी दमछाक होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर त्याचा परिणाम ऊस आणि साखर उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ८ हजार ८४९ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार हेक्टर क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवर ऊस लागवड झाली होती.

विहीर, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे. कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत असल्याने ऊस लागवड केली तर पाणी कसे उपलब्ध करायचे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळेच पूर्व हंगामातील ऊसलागवड करण्याबाबत शेतकऱ्यांनी धाडस केले नाही. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर ऊस पिकाची लागवड केली आहे.

ऊस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु पाणी कमी पडत असल्याने त्याचा परिणाम ऊस वाढीवर होत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात १ लाख ८ हजार ८४९ हेक्टवर झाली आहे. मात्र, अपुरा पाऊस, पावसाचा खंड आणि पाण्याची कमतरता याचा साऱ्या फटका ऊस लागवडीला बसला असून यंदा २७ हजार ३९ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here