नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या परिषदेच्या (ICAE) उद्घाटन समारंभप्रसंगी म्हणाले कि,आम्ही पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने दमदार वाटचाल करत आहोत. आमच्या इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम कृषी आणि पर्यावरण दोन्हीसाठी फायदेशीर आहे. 65 वर्षांपूर्वी भारतात झालेल्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत हे एक नवीन स्वतंत्र राष्ट्र होते. त्यावेळी भारताची अन्न सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासाठी हा एक आव्हानात्मक काळ होता. सध्या मात्र भारत हा अन्नधान्य, दूध, फळे, भाजीपाला, कापूस, साखर, चहा, कडधान्ये आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 1,589 कोटी लीटर झाली आहे, जी देशाची देशांतर्गत इथेनॉलची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. नोव्हेंबर 2023-जून 2024 दरम्यान पेट्रोलसोबत इथेनॉलचे मिश्रण 15.90 टक्क्यांवर पोहोचले आणि एकत्रित इथेनॉल मिश्रण 13.0 टक्क्यांवर पोहोचले. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अंदाजे 1016 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे आणि इतर वापरांसह इथेनॉलची एकूण गरज 1350 कोटी लिटर आहे.