सोलापूर : काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नेते केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांच्या काळात उसाची एफआरपी क्विंटलला केवळ २०० रुपये होती. ती आम्ही साडेतीनशे रुपये केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या मोठ्या नेत्याने उसाच्या एफआरपीसंबंधी काय केले, असा सवालही मोदी यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी मंगळवारी टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील कृषी विभागाच्या मैदानात प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, साखर कारखान्यांचे जुने इन्कमटॅक्स आमच्या सरकारने माफ केले. काँग्रेसचा पंजा शेतकऱ्यांना लुटत होता. परंतु आम्ही तीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. पूर्वी इथेनॉलची निर्मिती ४० हजार लिटर होत होती. आता ती ५०० कोटी लिटर होत आहे. साहजिकच त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. काँग्रेसने आपल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत ‘गरिबी हटाव’चा नारा दिला व सत्ता उपभोगली. आम्ही दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. ८० कोटी लोकांना रेशन दहा वर्षे मोफत देण्यात आले. हे सरकार रस्ते, रेल्वे, विमानतळ याच्या विकासासाठी खर्च करत आहे.
दरम्यान, कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी उजनीत आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून जागतिक बँकेने यासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या भागास सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आदी उपस्थित होते.