सांगली : यंदा साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे. त्यातून साखर कारखान्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली भर पडली आहे. सध्या साखरेचा दर प्रतिक्विंटल तीन हजार शंभरवरून तीन हजार आठशे रुपये झाला आहे. त्यामुळेच अधिकचे चारशे रुपये मागत आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या घामाचे व हक्काचे चारशे रुपये मिळावेत, अशी मागणी साखर कारखानदारांकडे करीत आहोत. आमची मागणी रास्त असून हे पैसे देऊनच कारखानदारांनी आगामी हंगामात कारखान्यांची धुराडी पेटवावीत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर बुधवारी (ता. १३) काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चाच्या नियोजनासाठी म्हैसाळ येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, भरत चौगुले, माजी पंचायत समिती सभापती दिलीपकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज शिंदे-म्हैसाळकर, अमर शेजवळकर प्रमुख उपस्थित होते.
शेतमालाला रास्त भाव मिळावा, यासाठी गेल्या हंगामात गाळप उसाचे दुसरे बिल प्रतिटन चारशे तातडीने द्या, वजनात होणारी काटामारी थांबवण्यासाठी साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल करा, या मागणीसाठी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत. तरी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मुबारक सौदागर यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, पिरगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, ऋषिकेश शिरोटे उपस्थित होते.