कोल्हापूर : साखर उद्योगाच्या वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आशेचा किरण आहे. एआयमुळे एकरी शंभर टनापर्यंत उत्पादन घेता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा बँकेकडून आणखी पाच ते दहा कोटींची तरतूद करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सरसेनापती संताजीराव घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने बारामतीच्या अॅग्री कल्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, युवराज पाटील, भय्या माने, कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे प्रमुख उपस्थित होते. एकरी उस उत्पादन वाढविले नाही तर साखर कारखानदारी बंद पडेल अशी भीती मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
कार्यशाळेत कृषिशास्त्रज्ञ डॉ. संतोष करंजे यांनी पिकासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग याची सविस्तर माहिती दिली. एआय तंत्रज्ञानासाठी वेदर स्टेशन नावाचे एक यंत्र उभारले जाते. प्रत्येक उसाला काय आवश्यक आहे काय नको आहे. जादा मात्रा व कमतरता याचे आकलन होते. जेथे गरज आहे तेथेच थेट उपाययोजना करता येतात असे ते म्हणाले. डॉ. शर्मिली माने, शेतकरी युवराज वारके यांचीही भाषणे झाली. जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी स्वागत केले.