कोल्हापूर : आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सेन्सिटिव्ह झोनमुळे आजरा कारखान्यात डिस्टिलरी उभारण्यास असलेली बंदी केंद्र सरकारशी संपर्क साधून उठवण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बिद्री कारखान्याच्या नूतन संचालकांच्या सत्कार प्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते. आता आजरा साखर कारखान्याचे रणशिंग फुंकले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले; परंतु त्या प्रयत्नाला यश आले नाही असे ते म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, बिद्री कारखान्याची सत्ता शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आमच्याकडे दिली आहे. उसालाही चांगला दर कोण देते, आणि शेतकऱ्यांचे हित पाहणारा कोण आहे, हे जाणून ऊस उत्पादक सभासदांनी बिद्रीची सत्ता पुन्हा के. पी. पाटील यांच्याकडे दिली. आता आजरा कारखाना मोठ्या अडचणीत आहे. कारखान्याची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. परंतु त्यास यश आले नाही. आता या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनेल आहे. कारखाना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक अडचणीतून सावरून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.