नवी दिल्ली : मान्सूनची प्रतीक्षा आणि उन्हापासून थोडा दिलासा शोधला जात असताना पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागात हवामानात बदल दिसून येत आहे. पारा वाढल्याने लोक पुन्हा उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांपर्यंत तापमान वाढ दिसून येईल. आयएमडीच्या पुर्वानुमानानुसार, पुढील काही दिवसांत यात आणखी वाढ होऊ शकते. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
न्यूज २४ऑनलाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, कोरड्या आणि गरम हवेमुळे तापमान वाढीचे परिणाम दिसत आहेत. अशात पुन्हा एकदा उष्णतेची लाट पसरू शकते. पुढील काही दिवसात काही राज्यांत ५० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील. देशाच्या उत्तर- पश्चिम भागात पुढील चार ते पाच दिवसात तापमान २ ते ४ डिग्री सेल्सिअसने वाढेल. तर मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमान २ ते ३ डिग्रीपर्यंत वाढू शकेल.
दरम्यान, सर्व काही सुरळीत झाले तर गुरुवारी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकेल असे आयएमडीचे म्हणणे आहे. यापू्र्वी मान्सून ४ जून रोजी दाखल होईल असे अनुमान होते. बदलत्या परिस्थितीत यास उशीर होत आहे. तर स्कायमेटने दिलेल्या पूर्वानुमानानुसार, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग, तामिळनाडू, अंदमान निकोबार द्वीपसमूह अशा काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. तर पश्चिम हिमालय, नागालँड, मणिपूर, मिझाराम, सिक्किमसह काही ठिकाणी पाऊस कोसळू शकतो. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणासह काही भागात हलक्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.