मालदा : जिल्ह्यात ३०० कोटी रुपये खर्चून ५२ एकर जमिनीवर उत्तर बंगालमधील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट उभारला जाणार आहे. या प्लांटमधून सुमारे ५०० जणांना थेट रोजगार मिळणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने प्लांट उभारण्यासाठी सुमारे २८.१५ एकर जमीन ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. तर कंपनीने उर्वरित जमीन स्वतः संपादित केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्लांटचे काम लवकरच सुरू होईल आणि 8 महिन्यांत उत्पादन सुरू होईल.
याबाबत, Millennium post मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखाना मालकांनी उभारणीस सहकार्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. प्लांटमध्ये दररोज इथेनॉलचे उत्पादन होणार असून ते विविध सरकारी तेल कंपन्या थेट खरेदी करू शकतील. प्रकल्पातून ५०० जणांना थेट रोजगार मिळेल. यामध्ये ३०० कुशल कामगार असतील तर २०० अकुशल कामगारांचा यात समावेश असेल.
कारखान्याच्या मालकांपैकी एक असलेले राजेंद्र जैन म्हणाले की, कारखान्यात दररोज ६०० टन मका किंवा तांदूळ कच्चा माल म्हणून वापरला जाईल. यासाठी वर्षाला सुमारे दोन लाख टन मका आणि तांदळाची गरज भासेल. स्थानिक लोकांनी आम्हाला कच्चा माल द्यावा अशी अपेक्षा आहे. कारखान्यामुळे पर्यावरण प्रदूषित होणार नाही.
कारखान्याचे भागीदार बिधान चंद्र रॉय म्हणाले, “दिवसेंदिवस इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून वापर वाढत आहे. इथेनॉलचा वापर वाढल्यास इंधन आयात कमी होईल. त्यामुळे देशाचे परकीय चलन वाचेल. मका आणि तांदूळ पुरवठ्याचा मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर आणि दक्षिण दिनाजपूर येथील १०,००० हून अधिक शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष फायदा होईल.