सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामात केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी २०२२-२३ व्या गळीत हंगामात घेतलेल्या उसाचे प्रतिटन ५० आणि १०० रुपयांप्रमाणे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जाहीर केलेली मुदत संपली आहे. आता साखरेचे दर वाढलेले आहेत. तरीही साखर कारखान्यांनी पैसे देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमचे एफआरपीच्यावरील ५०, १०० रुपये मिळणार की नाही ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितले की, साखर निर्यातीवरील बंधणे हटविल्याने साखरेच्या भावात वाढ झाली आहे. साखरेच्या भावात क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे पैसे देणे कारखानदारांना शक्य आहे. एफआरपीहून अधिक रक्कम असल्यामुळे साखर आयुक्त यांच्याकडून कारखाना व्यवस्थापनाने परवानगी घेतली पाहिजे. मात्र, कारखान्यांनी अधिकचे पैसे देण्याबाबत कोणतीच भूमिका घेतलेली नाही. याबद्दल साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तक्रार केली आहे. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल. दरम्यान, सध्या मध्यम प्रकारच्या (एम-३०) साखरेचे भाव क्विंटलमागे ३० ते ३९ रुपयांनी वाढले आहेत. बुधवारी ३००२ ते ३१२१ रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर असणारे एम-३० साखरेचे भाव गुरुवारी ३०४१ ते ३१५१ रुपये प्रतिक्विंटल झाले.