नवी दिल्ली : युक्रेनवर रशियाकडून आक्रमणाची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्व जगाच्या नजरा अमेरिका आणि रशिया यांच्यातील चर्चेकडे लागल्या आहेत. मात्र, यामध्ये फारशी गतीन नसल्याने जगभगातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. अनिश्चिततेमुळे इंधनाच्या किमतीही वाढत आहेत. अशआ स्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक देशांकडून इतर उपाययोजना केल्या जात आहेत. भारताने अद्याप या मुद्यावर कोणतीही भूमिका घेतली नसली तरी लवकरच भारत आपले म्हणणे मांडेल अशी अपेक्षा आहे. याबाबत हिंदुस्थान टाइम्सच्या एका अहवालात युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या संभाव्य शक्यतांवर, परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या आक्रमणाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर दिसू शकतो. आधीच इंधन दर उच्च स्तरावर आहेत. सध्या गेल्या आठवडाभरापासून कच्च्या तेलाचा दर ९० डॉलर प्रती बॅरल आहे. आर्थिक सर्वेक्षणात ७०-७५ ड़लर प्रती बॅरलची शक्यता वर्तविली होती. रॉयटर्सने म्हटले आहे की, दोन्ही बेंचमार्क सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी सप्टेंबर २०१४ नंतर आपल्या उच्च स्तरावर आहे. त्यामध्ये ब्रेंट ९६.७८ $ आणि डब्ल्यूटीआय ९५.८२ $ पर्यंत पोहोचले आहे. जागतिक कच्च्या तेल उत्पादनात रशियाचा वाटा जवळपास १३ टक्क्यांचा आहे. ओपेक देशांच्या एकूण उत्पादनाच्या हा निम्मा वाटा आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक गॅसच्या किमततही वाढीची शक्यता आहे. त्याच्या जागतिक पुरवठ्याचा ४० टक्के हिस्सा रशियाकडूनच होतो.
अमेरिकेने रशियावर कडक निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्यानंतर हे निर्बंध रशियासोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला लागू होतील. २०२१ च्या अखेरीस ब्लादिमीर पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भारतात आले होते. तेव्हा रशिया-भारत संबंध अधिक मजबूत करण्याची चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही भारताच्या योजनांमध्ये अडचणी येऊ शकतात. गेल्या आर्थिक वर्षात, २०२०-२१ मध्ये रशियाची आयात भारताच्या आयातीच्या १.४ टक्के होती. भारत आणि रशिया यांदरम्यान व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढविणे हा दोन्ही देशांचा प्राधान्यक्रम आहे. द्विपक्षीय गुंतवणूक ३.७५ लाख कोटी रुपये (५० बिलियन डॉलर) आणि द्विपक्षीय व्यापार २.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे संशोधन उद्दीष्ट निश्चित करण्यात आला आहे.
रशिया जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटकडून जारी करण्यात आलेल्या २०२१ च्या फॅक्टशीटनुसार रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात हत्यारांची आयात केली जाते. भारताने २०१९-२० मध्ये विविध प्रकारच्या शस्त्रांची नवी ऑर्डर दिली आहे. पुढील पाच वर्षात रशियाकडून शस्त्रांच्या निर्यातीत वाढ होईल.
मॉस्कोतील भारतीय दुतावासाच्या वेबसाईटनुसार, भारत-रशिया सैन्य तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यापासून खरेदीदार-विक्रेता संबंध, संयुक्त संशोधन, डिझाइन विकास, अत्याधुनिक उत्पादनासाठी विकसित झाले आहे. ब्राह्मोस क्रूझ मिसाईलचे उत्पादन हे त्यातील एक उदाहरण आहे. दोन्ही देश पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आणि बहु भूमिकेतील वाहतुकीच्या विमानाच्या संयुक्त डिझाइन आणि विकासात सक्रीय आहेत. भारत इतर देशांशी आपले संबंध मजबूत करीत आहे. यामध्ये Quadrilateral Security Dialogue (QUAD) चा समावेश आहे. रशियासोबत गेल्यास QUAD सोबतच्या संबंधात अडचणी येऊ शकतात.