नवी दिल्ली : आठवडाभरात गव्हाच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गव्हाचे भाव आणखी वाढू शकतात. कमी किमतीत मोठ्या प्रमाणात खरेदी आणि बाजारात गव्हाची कमी झालेली आवक यामुळे गव्हाची किमत वाढू लागली आहे. एका आठवड्यात गव्हाचे भाव 100 ते 130 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोई मंडईतील गव्हाचे व्यापारी संजीव अग्रवाल यांनी सांगितले की, या महिन्यात मंडईंमध्ये गव्हाची आवक मंदावली आहे. सध्या मंडईत 10,000 पोती गव्हाची आवक होत आहे. गेल्या महिन्यात 15,000 पेक्षा जास्त पोत्यांची आवक झाली होती. आवक कमी असल्याने गव्हाचे दर वाढले आहेत. आठवडाभरात गव्हाच्या दरात 100 रुपयांची वाढ होऊन दर 2300 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत.
दिल्लीतील गव्हाचे व्यापारी महेंद्र जैन यांनी सांगितले की, गेल्या एका आठवड्यात दिल्लीत गव्हाची किमत 130 रुपयांनी वाढून 2,440 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. कमोडिटी विश्लेषक आणि अॅग्रीटेक कंपनी ग्रीन अॅग्रीव्होल्यूशन प्रायव्हेट लिमिटेडचे संशोधन प्रमुख इंद्रजित पॉल म्हणाले की, मिलर्स आणि इतर खरेदीदारांनी 2,100 ते 2,200 रुपयांच्या दराने भरपूर गहू खरेदी केला आहे. त्यामुळे सध्या गव्हाचे भाव वाढू लागले आहेत.
संजीव अग्रवाल म्हणाले की, भविष्यात गहू आणखी महाग होऊ शकतो. हरदोई मंडीमध्ये किंमत 2,400 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पॉल म्हणाले की, पुढील महिन्यापर्यंत दिल्लीत गव्हाचा भाव 2,500 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे जाऊ शकतो. खुल्या बाजारात गहू विकण्याची योजना सरकारने आणली नाही तर त्याची किंमत 2,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकते.