कानपूर : गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून गरम हवेमुळे गव्हाचे पिक उद्ध्वस्त केले होते. यावेळी जानेवारी महिन्याच्या अखेरीस हवामान चांगले होते. मात्र, फेब्रुवारीत अचानक तापमान वाढले आहे. मंगळवारी कानपूर विभागाचे तापमान ३० डिग्रीपेक्षा अधिक झाले. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. मात्र, जर तापमान वाढले तर गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उन्नावचे शेतकरी भानू प्रताप सिंह यांनी सांगितले की, सध्या गव्हाची स्थिती चांगली आहे. मात्र, जर तापमान वाढले तर जमिनीमधील ओलावा संपुष्टात येईल. त्यामुळे गव्हाचा दाणा कमकुवत होईल. उन्नावमधील शेतकऱ्यांनी ७० टक्के मोहरी आणि ३० टक्के गव्हाची पेरणी केली आहे. आता गव्हाचे दाणे विकसित होत आहेत. गव्हाच्या पिकाला सिंचनाची गरज आहे. मात्र, असोहामधून कालव्यात पाणीच नाही. शेतकरी आपापली तयारी करीत आहेत. उन्नावचे युवा शेतकरी अंकित यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे गव्हामुळे पिक धोक्यात आले आहे.