युपी: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन दिवसात पोहोचणार गव्हाचे पैसे

देशात गव्हाची खरेदी गतीने सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गव्हाची कापणी करून तो विक्रीसाठी मंडईत आणण्यास सुरुवात केली आहे. तर राज्य सरकारनेही गव्हाच्या खरेदीची आकडेवारी पडताळणीस सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणात गव्हाच्या खरेदीची स्थिती चांगली असल्याचे सांगितले जात आहे. तर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अत्यंत संथ गतीने खरेदी सुरू आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने खरेदीची गती वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एमएसपी मिळावी, त्याचा चांगला दर मिळावा याचे नियोजन करण्यात आले आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसोबत गहू, तिळ, ज्वारी, बाजरीसह धान्य खरेदीचा आढावा घेतला. बाजारात गहू घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून त्याची कोणत्याही परिस्थितीत खरेदी केली जावी. त्यांना ३ दिवसांत पैसे मिळावेत, असे निर्देश त्यांनी दिले. एक एप्रिलपासून रब्बी पिकांची खरेदी सुरू झाली आहे. सरकार जास्तीत जास्त शेतकरी मंडईत पिक घेवून यावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात कमी शेतकरी मंडईत गहू अथवा इतर पिके विक्री करण्यास येत आहेत. पावसामुळे पिकाच्या कापणीस उशीर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याशिवाय व्यापारी सरकारी काट्याऐवजी थेट बाजाराचा आधारही घेत आहेत. पाऊस, गारपिटीने गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.
राज्य सरकारकडील आकडेवारीनुसार, रब्बी पिकांच्या खरेदीसाठी ६,००० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी ५,७२९ केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून १,४८,३८९ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. ४३८१ केंद्रांवर खरेदी सुरू असून आतापर्यंत ३१,१०५ शेतकऱ्यांकडून १.३७ लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना २४०.६५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here