नवी दिल्ली : खुल्या बाजारातून गव्हाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवाढ सुरुच आहे. या गव्हाच्या दरवाढीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूर्व भारतातील बाजारातून गहू गायब झाला आहे. तर उत्तर प्रदेशातील बाजारामध्ये गव्हाचा साठा खूपच कमी आहे. उत्तर प्रदेशातील बाजारात गहू गुजरातमधून येत आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, गव्हाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गव्हाच्या दराने क्विंटलमागे ३००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत गव्हाचा भाव ३०४४.५० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे, तर उत्तर प्रदेशमध्येही भाव ३००० रुपये प्रती क्विंटलच्या पुढे गेला आहे. वर्ष २०२३ साठी गव्हाचा एमएसपी २,१२५ रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात आला होता. मात्र, गव्हाच्या पुरवठ्याअभावी भाववाढ सुरूच आहे. खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे (OMSS) गहू विक्री किती होईल याची स्थिती स्पष्ट नाही. यासोबतच केंद्र सरकारने रास्त धान्य दुकानांतून PMGKAY योजनेअंतर्गत गव्हाचे वितरणही बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मागणी जास्त राहिल्याने गव्हाच्या दरात वाढ होत आहे. आटा चक्क्यांवरही गहू तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे.