देशात गव्हाचे भाव भिडले गगनाला, गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागात गव्हाचा दर ३,००० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. पूर्व भारतात धान्य कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. धान्य व्यापाराशी संबंधीत लोक आणि व्यावसायिकांनी यास दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारने खुल्या बाजारात ओएमएसएस योजनेअंतर्गत गव्हाची विक्री करण्याचे पाऊल अद्याप उचललेले नाही. त्यामुळे गव्हाचे दर दररोज नव्या उच्चांकावर पोहोचत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गव्हाचे वाटप रोखले असल्याने खुल्या बाजारात मागणी वाढली आहे असे भारतीय रोलर फ्लॉवर मिल्स फेडरेशनचे (आरएफएमएफआय) अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात गव्हाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. दिल्लीस्थीत एका व्यावसायिकाने सांगितले की, सर्वात मोठ्या उत्पादक उत्तर प्रदेशला आता गुजरातमधून गहू खरेदी करावा लागत आहे. युपीत याचा दर ३०५० रुपये प्रती क्विंटल आहे तर राजस्थानमध्ये हा दर २८०० रुपये प्रती क्विंटल आहे. व्यावसायिकांना वाहतूक खर्चही उचलावा लागत आहे. कृषी मंत्रालयाच्या एगमार्केटवरील आकडेवारीनुसार, आठ जानेवारी रोजी गव्हाचा दर २७८८ रुपये प्रती क्विटंल होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर २० टक्के अधिक आहे. घाऊक बाजारात गव्हाचा दर ३१.१७ रुपये प्रती किलो आहे. हा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत १५.७६ टक्के अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here