नवी दिल्ली : देशातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त असूनही गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. येत्या १० ते १५ दिवसांत तापमानात असामान्य वाढ किंवा उष्णतेची लाट येण्याचा कोणताही अंदाज नाही, असे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक चौधरी श्रीनिवास राव यांनी ‘एफई’ला सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रात्रीचे तापमान थंड असल्याने पिकाला मदत होत आहे. तथापि, राव म्हणाले की मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापणीपूर्वीचे तापमान पिकाच्या उत्पादनाचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
यंदाच्या हंगामात गव्हाची पेरणी गेल्या वर्षीच्या ३१.५६ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत ३२ दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढली आहे आणि गेल्या पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त आहे.गेल्या तीन वर्षांत गव्हाच्या कापणीपूर्वी जास्त उष्णता आणि मार्चमध्ये अवकाळी पाऊस यामुळे गव्हाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला होता. रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नवनीत चितलांगिया म्हणाले की, मार्चपर्यंत नवीन पिके बाजारात येण्याआधी मिलर्सकडे पुरेसा साठा नाही. चितलांगिया म्हणाले की, फेडरेशनने २०२३-२४ पीक वर्षात (जुलै-जून) १०५-१०६ दशलक्ष टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यंदा उत्पादन ३%-४% वाढण्याची अपेक्षा आहे.कृषी मंत्रालयातर्फे २०२४-२५ पीक वर्षाचा पीक अंदाज लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.चितलांगिया यांनी सांगितले की, दिल्लीत सध्या गव्हाचे दर ३२०० रुपये प्रति क्विंटल आहेत. पुढील सहा आठवड्यांत बाजारात नवीन पीक येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.