नवी दिल्ली : देशातील रब्बी हंगामात यंदा आतापर्यंत गव्हाची जोरदार पेरणी झाली आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत १.५२ कोटी हेक्टरमध्ये गहू लावण्यात आला आहे. तर गेल्यावर्षी समान कालावधीत १.३८ कोटी हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली होती. यंदा देशात बंपर उत्पादन होईल असे अनुमान आहे. हिवाळ्याच्या कालावधीत देशभरात रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने गव्हाची लागवड केली जाते. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडील माहितीनुसार, सध्या देशभरात गव्हाची पेरणी गतीने होत आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च, एप्रिलमध्ये गव्हाचे उच्चांकी उत्पादन होवू शकते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नोव्हेंबरपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या एकूण पेरणीत गव्हाचा हिस्सा ५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी खराब हवामानामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले होते. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, राजस्थान पंजाब, बिहार, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची जादा पेरणी झाली आहे. अभ्यासकांच्या मते २०२२-२३ मध्ये गव्हाचा साठा पूर्ववत झाल्याने रब्बी हंगाम महत्त्वपूर्ण ठरेल. गेल्यावर्षी उन्हाळ्याची लवकरच सुरुवात झाल्याने धान्यसाठा कमी झाला होता. गव्हाचा साठा १४ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला होता. खुल्या बाजारात धान्य कमी असल्याने गेल्यावर्षी आट्याच्या किमतीत १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.