हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सातारा : चीनीमंडी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. निवडणुकीत थकीत एफआरपीचा मुद्दा येऊ नये, म्हणून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिला हप्ता देऊन, वेळ मारून नेली. पण, मतदानाचा दिवस जवळ आला तरी, अद्याप शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. सातारा जिल्ह्याचा विचार केला, तर जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नाही.
पश्चिम महाराष्ट्रात जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम आटोपता घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १५ साखर कारखान्यांमध्ये ८४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. सरासरी ११.९४ टक्के उताऱ्यातून त्यातून एक कोटी एक लाख टन ऊस उत्पादन झाले आहे. चांगला उतारा आणि ऊसही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन झाले आहे. परिणामी साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर शिल्लक आहे. साखरेला उठाव नसल्याने या शिल्लक साखरेच्या स्टोअरेजची समस्या निर्माण झाली आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांकडे गंगाजळी कमी आहे. त्यामुळे दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय झाला. त्यात ८०-२० सूत्रानुसार कारखान्यांनी पहिला हप्ता दिला. पण, दुसऱ्या हप्त्याची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आता सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याने कारखान्यांच्या हातात पैसे येतील आणि एफआरपीची दुसरा हप्ताही मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे एफआरपीच्या दुसऱ्या हप्त्यावर साखर कारखान्यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.