नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात भाजीपाला, खाद्य पदार्थांच्या वस्तूंचे दर कमी झाल्याने घाऊक महागाईच्या दरात घट झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याची आकडेवारी जारी केली आहे.
काय आहे महागाईची स्थिती
डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईच्या निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर १.२२ टक्के इतका राहिला. नोव्हेंबर महिन्यात हा दर १.५५ टक्के इतका होता. तर डिसेंबर २०१९ मध्ये घाऊक महागाईचा दर २.७६ टक्क्यांवर होता.
फूड इंडेक्समधूनही महागाईत घट
डिसेंबर महिन्यात खाद्य पदार्थांच्या दरात घट झाली आहे. परिणामी घाऊक महागाईच्या निर्देशांतही कपात झाली. डिसेंबर महिन्यात फूड इंडेक्समधील चलनवाढीचा दर घटून ०.९२ टक्क्यांवर आला. नोव्हेंबर महिन्यात हाच दर ४.२७ टक्के इतका होता.
कांदा, बटाट्याच्या दरही कमी
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्योग तथा आंतरिक व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याचे दर १३.२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. कांद्याच्या किमतीत ५४.६९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर नोव्हेंबर महिन्यात कांदा ७.५८ टक्के स्वस्त झाला होता. डिसेंबर महिन्यात बटाट्याच्या दरात ३७.७५ टक्के वाढ झाली. तर नोव्हेंबर महिन्यात बटाटे ११५.१२ टक्के महागले होते. याशिवाय डिसेंबर महिन्यात कडधान्य, तांदूळ, गहू, डाळींच्या चलनवाढीचा दर नोव्हेंबरच्या तुलनेत कमी झाले आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यात फळांचे घाऊक दर नोव्हेंबरपेक्षा अधिक राहिले.
इंधन, वीज महाग
डिसेंबर महिन्यात इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाई वाढली आहे. या क्षेत्रातील चनलवाढीच्या दरात ३.१८ टक्के इतकी किरकोळ वाढ झाली आहे. मुख्य स्तरावर पेट्रोलियम आणि कोळशाच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, वीजेचे दर स्थिर राहिले आहेत.
किरकोळ महागाईच दरही घटला
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दरही घटून ४.९ टक्क्यांवर आला आहे. यामुळे खाद्य पदार्थांची किंमत घटली आहे. मात्र, एका अहवालानुसार इक्रा रेटिंग एजन्सीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी मुख्य महागाईचा दर ४.२ टक्क्यांवर पोहोचल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. हा गेल्या दोन वर्षातील उच्च दर आहे.