नवी दिल्ली : चीनी मंडी
गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढत चाललेले इंधनाचे दर, एका रात्रीत घसरायला लागले आहेत. जवळपास दहा डॉलर प्रति बॅरलने इंधन दर घसरले असून, गेल्या दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर आले आहेत. जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाने पुन्हा तेल उत्खननाचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती घसरू लागल्या आहेत.
तेलाच्या किमती घसरणं, हे भारतासाठी नेहमीच फायदेशीर असतं. कारण, भारत हा तेलासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. भारताच्या एकूण गरजेच्या दोन तृतीयांश गरज हे तेल आयातीतूनच भागते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा ताण भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो. विशेषतः सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडते.
तेलाचे दर प्रति बॅरल १० डॉलरने घसरल्यामुळे भारतातील किरकोळ बाजारातील महागाई ०.२ टक्क्यांनी कमी होईल, तर घाऊक बाजारातील महागाई ०.५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे.
तेलाच्या किमती घसरल्यामुळे भारतीय रुपयालाही फायदा होतो. दोन दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबरला भारतीय रुपये गेल्या तीन आठवड्यांतील मजबूत स्थितीत होता.
तेलाच्या किमतींचा परिणाम भांडवली बाजारातही दिसून येतो. बॉन्ड उत्पन्नाकडे वळलेल्या बँकांच्या गंगाजळीत वाढ होऊ शकते. निर्देशांकातील ३० टक्के वाटा हा बँकांचा अर्थात आर्थिक संस्थांचा असल्यामुळे याचा परिणाम संपूर्ण निर्देशांकावर होतो.