पुणे: चीनी मंडी
भारतच नव्हे तर एकूण जगातील साखर उद्योग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे चिंतेत असताना महाराष्ट्रात पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर ऊस क्षेत्र घटणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पुढच्या हंगामात महाराष्ट्रातील ऊस क्षेत्र ४० टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत. याला पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनेही दुजोरा दिला आहे.
या संदर्भात इन्स्टिट्यूटचे संचालक विकास देशमुख म्हणाले, ‘राज्यात उसाचे क्षेत्र ६ ते साडे सहा लाख हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे.’ पुण्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने आयोजित परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील शेतकरी तीन वेगवेगळ्या हंगामात ऊस लागवड करतात. यंदा अडसाली उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. राज्यात १ लाख १९ हजार हेक्टर वरच या उसाची लागवड झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते ४७ टक्क्यांनी कमी आहे. उसाची हे पिक १८ महिन्यांत येते. राज्यात २०१८ मध्ये लागवड झालेल्या ११ लाख ५० हजार हेक्टर उसापैकी २ लाख २४ हजार क्षेत्र अडसाली उसाचे होते.
सध्या महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारखान्याचे ऊस सुकण्यापूर्वी न्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्यासाठी कमी पैसे घेण्याचीही त्यांची तयारी आहे. राज्यात पुढच्या वर्षी उसाचे क्षेत्र कमी होणार असले तरी, यंदा साखर उत्पादन आश्चर्यकारकरित्या वाढले आहे.
राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ म्हणाले, ‘राज्यात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त साखर उत्पादन होत आहे. उसावर रोगांचा प्रादुर्भाव असल्यामुळे साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज होता. पण, ऊस क्षेत्र जास्त असल्यामुळे अखेर साखर उत्पादन जास्त झाले. राज्यातील साखर उत्पादनाने १०० लाख टनाचा टप्पा यापूर्वीच ओलांडला आहे आणि एकूण उत्पादन १०७ लाख टन होण्याची शक्यता आहे.