कोल्हापूर : उसाचे एकरी उत्पादन वाढले असले तरी उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. महागाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. साखरेबरोबरच इथेनॉल आणि मोलासीसमधून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यालाही त्याच्या घामाचा मोबदला मिळाला पाहिजे. त्यामुळे यंदा कसल्याही स्थितीत एफआरपीपेक्षा जादा दर घेणारच, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
सरवडे (ता. राधानगरी) येथे ऊसदर जागृती अभियान प्रारंभप्रसंगी शेट्टी बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, ऊस हंगाम सुरु होण्यापूर्वी शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही चार महिने अगोदर सरकारला जादा दरासाठी सूचना दिल्या आहेत. सरकारने जर एफआरपीपेक्षा जादा दर दिला नाही तर आम्ही राज्यात राडा करू, असा निर्वाणीचा इशाराही शेट्टी यांनी दिला. अध्यक्षस्थानी रंगराव पाटील होते.
शेट्टी म्हणाले कि, शासनाला प्रति टन 300 रुपयांचा फायदा होतो. कर्नाटक राज्यात साखरेसोबत अन्य उपपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचा आदेश काढला आहे. आता राज्यात ही ऊसदर जनजागृती करून लढा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.