सांगली : पुणदी गावातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या सछिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीसाठी क्रांती कारखान्याच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. पुणदी येथे श्री हनुमान बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या आणि क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर संयुक्त विद्यमाने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प सर्व्हे प्रारंभ प्रसंगी बोलत होते. पुणदीत २५२ एकर क्षेत्राचा सर्व्हे करून सच्छिद्र पाइपलाइनद्वारे निचरा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुधोंडी पुणदी, बुर्ली, धनगाव येथे शेतकरी बैठका झाल्या होत्या. त्यातून हा प्रकल्प राबवली जात आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले की, निचरा पाइपचे काम पूर्ण झाल्यावर शेतकरी ते क्षेत्र लागवडीखाली आणू शकतील. जेवढे जास्त शेतकरी या प्रकल्पात सहभागी होतील तेवढा खर्च कमी होईल आणि शासनाचे अनुदान मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. पुणदीसारखे इतर गावांनीही पुढे यावे. यासाठी क्रांती अर्बन सोसायटीद्वारे आर्थिक साहाय्य केले जाईल. यावेळी पुणदीचे सरपंच दीपक पाटील, क्रांतीच्या संचालिका अश्विनी पाटील, जयप्रकाश साळुंखे, हुतात्माचे संचालक रामचंद्र पाटील, विष्णू शिरटेकर, उपसरपंच हौशेराव जाधव, शिवाजी केसरे, राजेंद्र पाटील, उमेश जाधव, युवराज पाटील, हनुमान विकास सोसायटीचे अध्यक्ष सुरेश दमामे, अभियंता कीर्तिवर्धन मर्जे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांचेसह पुनदीतील शेतकरी उपस्थित होते.