छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्याच काळात हा कारखाना बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे व मजुरांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर शेतमजुरांच्या हाताला काम मिळेल; तसेच छोटे-मोठे उद्योग उभे राहतील, असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी केले. आगामी काळात देवगिरी कारखान्यासह आरोग्य, जलसंधारण, मका प्रक्रिया उद्योग यांसारख्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुराधा चव्हाण यांनी सांगितले की, मतदारसंघात जलसंधारणाचे मोठे काम करणार आहे, जेणे करून प्रत्येक गावाला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याचा स्रोत निर्माण होईल. फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पात पाण्याचा साठा कमी येत असल्याने नदीजोड प्रकल्पाद्वारे बंद नलिकेद्वारे नदीमधील वाहणारे पाणी या प्रकल्पात वळविण्यात आले आहे. त्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शंभर कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यात शेतकऱ्यांना आपल्या शेतात दोन पिके हमखास घेता येणार आहेत. मतदारसंघात मका आणि कपाशी या दोन पिकांची प्रामुख्याने शेतकरी लागवड करीत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मकावर प्रक्रिया करणारा उद्योग लवकरच उभारला जाणार आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.