महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला ऊर्जा केंद्रात रुपांतरित करण्याचे WISMA चे उद्दिष्ट : बी. बी. ठोंबरे

पुणे : महाराष्ट्रातील 133 खाजगी साखर कारखानदारांची सर्वोच्च संस्था असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारिणीवर २०२४-२०२७ या कालावधीसाठी सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. तर शनिवारी, १४ सप्टेंबर २०२४ रोजी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी बी. बी. अध्यक्षपदी ठोंबरे, उपाध्यक्षपदी आमदार रोहित पवार आणि सरचिटणीसपदी पांडुरंग राऊत यांची निवड करण्यात आली. ‘विस्मा’चे निवडणूक अधिकारी तथा कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. साखर उद्योगातील तज्ज्ञ मानद सदस्य म्हणून माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि श्री रेणुका शुगर्स लि. (नवी दिल्ली)चे कार्यकारी संचालक रवी गुप्ता यांची निवड करण्यात आली.

कार्यकारी समितीचे सदस्य असे : १) बी. बी. ठोंबरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, जिल्हा यवतमाळ), २) आमदार रोहित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी बारामती ऍग्रो लिमिटेड, जिल्हा पुणे), ३) डॉ. पांडुरंग राऊत (चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, श्रीनाथ म्हस्कोबा शुगर फॅक्टरी लिमिटेड, जिल्हा पुणे), ४) खासदार बजरंग सोनवणे, (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड, जिल्हा बीड), ५) महेश देशमुख (चेअरमन, लोकमंगल उद्योग समूह, जिल्हा सोलापूर), ६) रणजित मुळ्ये (कार्यकारी संचालक, गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन लि., जि. अहमदनगर), ७) यशवर्धन डहाके (चेअरमन, पराग ऍग्रो फूड्स अँड अलाईड प्रोडक्ट्स प्रा. लि., जि. पुणे) ८) गौरवी भोसले (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि., जि. लातूर), ९) योगेश पाटील (कार्यकारी संचालक, अथणी शुगर्स लिमिटेड, जिल्हा सातारा), १०) राहुल घाटगे (कार्यकारी संचालक, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, जिल्हा कोल्हापूर), ११) रोहित नारा ( संचालक, सदगुरु श्री साखर कारखाना मर्यादित, जिल्हा सांगली)

‘विस्मा’च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर ‘चीनीमंडी’शी बोलताना बी. बी. ठोंबरे म्हणाले की, साखर उद्योगाच्या विकासासाठी ‘विस्मा’ने नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. भविष्यातही हा प्रयत्न सुरूच राहील. माझी तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महाराष्ट्रातील खाजगी साखर क्षेत्राचा मी ऋणी आहे. पुढील तीन वर्षांत साखर उद्योगाला ऊर्जा केंद्रात रूपांतरित करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि आम्ही इथेनॉल, बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन शोधांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

ते म्हणाले, केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांत उत्पादन खर्चाच्या आधारे उसाच्या रास्त व किफायतशीर भावात (एफआरपी) वाढ करत आहे. मात्र साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. सध्या साखरेचा एमएसपी केवळ ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, उत्पादन खर्च सरासरी ४१०० ते ४२०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी ‘विस्मा’च्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

ठोंबरे म्हणाले की, इथेनॉल खरेदी दर वाढवण्याबरोबरच साखर निर्यातीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांचे व्यवस्थापन, उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष विक्रीतून मिळणारा महसूल यात तफावत असल्याने अनेक साखर कारखाने तोट्यात गेले आहेत. साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर केंद्र सरकारने साखरेचा सरासरी विक्री दर ४,२०० रुपये प्रती क्विंटलवर आणावा. दरवर्षी साखरेच्या निर्यातीला कायमस्वरूपी परवानगी देण्याची मागणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here